धुळे : शहर व ग्रामीण भागातील केबलद्वारे होणारे बुधवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आल्याने केबल चालकांसह ग्राहकांची मोठी अडचण झाली असून प्रक्षेपण पूर्ववत सुरू करून ट्रायच्या निर्देशानुसार मार्चअखेर प्रक्षेपण सुरू ठेवा, अशी मागणी जिल्हा केबल आॅपरेटर संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.केबल प्रक्षेपणातील ट्रायच्या नियमाप्रमाणे प्रत्येक ग्राहकास त्याच्या आवडीचे चॅनेल देण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यानुसार शहर व ग्रामीण भागात डीएलजीटीपीएल अंतर्गत एमएसओ अंतर्गत स्थानिक केबल चालक (एलसीओ) तब्बल ७० हजार ग्राहकांना सेवा पुरवित आहेत.चॅनल निवडीबाबतचे अर्ज ग्राहकांना केबल चालकांकडून देण्यात येत आहेत. याबाबत ट्रायकडे वेळोवेळी कळवून मुदतवाढ मागण्यात येत आहे. त्याप्रमाणे १२ रोजी ट्रायने प्रक्षेपणातील चॅनेल निवडीच्या कार्यक्रमास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.मात्र शासनाकडून १३ फेब्र्रुवारीच्या रात्री १२ वाजेपासून सर्व प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व केबल चालक आणि त्यांचे सर्व ७० हजार ग्राहक मोठ्या अडचणीत सापडले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.नियमित व हमखास मनोरंजनाचे साधन असलेल्या टीव्हीवरील कार्यक्रम दिसेनासे झाल्याने आबालवृद्ध पुरूष, महिला व बालक यांची मागणी वाढत आहे.या कार्यवाहीचा विपरित परिणाम जनजीवनावर झाला असून उद्रेकाची शक्यताही नाकारता येत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.त्यामुळे शासनाने ट्रायने वाढविलेल्या ३१ मार्चअखेरपर्यंत वाढविलेल्या मुदतीत प्रक्षेपण पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावे. तरच ग्राहकांकडील आवडीच्या चॅनेलसंदर्भात अर्ज भरून घेणे शक्य होणार आहे. तरी आपण निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांना निवेदन देण्यात आली.यावेळी संघटनेचे अभय मिस्तरी, मिलिंद पंचभाई, सचिन कुळकर्णी, संजय निकम, रवी शर्मा, अनिल सोनजे, बाळू शर्मा, ओम शर्मा आदी उपस्थित होते. निवेदनानंतर निदर्शनेही करण्यात आली.
केबल चॅनलवरील प्रक्षेपण बंद, ७० हजार ग्राहक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 10:03 PM