देवेंद्र पाठक, धुळे : शिरपूर येथील बसस्थानकाच्या आवारात गांजाची विक्री करण्यासाठी फिरणाऱ्या दोघा संशयित तरुणांना शिताफिने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गांजा आणि मोबाइल असा ६७ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली. बुधवारी पहाटे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरपूर येथील बसस्थानक आवारात रात्रीच्या अंधारात दोन तरुण काहीतरी विक्री करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरत होते. ही बाब शिरपूर पोलिसांना कळताच पथकाने धाव घेऊन बसस्थानक आवारात पाहणी केली. त्यांना दोन तरुण संशयितरित्या उभे असलेले दिसून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्याने दोघा तरुणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील बॅगची तपासणी आणि त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे १२ हजार ८४० किलाे वजनाचा ६४ हजार २०० रुपये किमतीचा गांजा आणि ३ हजार रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण ६७ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी भूषण कोळी यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, हुसेन मोहम्मद हानीफ नागाणी उर्फ सय्यद (वय १९, रा. गोंडल, जि. राजकोट, गुजरात) आणि सुनील उर्फ किरण भावेशभाई सियाल (वय १९, रा. लोहानगर जि. राजकोट, गुजरात) यांना अटक करण्यात आली. प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप दरवडे करीत आहेत.