धुळे : शिरपूर तालुक्यातील रेकलीयापाणी धरणाच्या परिसरात पोलिसांनी मंगळवारी पहाटे छापा टाकून सुमारे २ ते ३ एकर क्षेत्रावरील गांजाची शेती उदध्वस्त केली. तसेच धरणाच्या कडेला पडलेला सुमारे १२० किलो सुका गांजा जप्त केला. या कारवाईत सुमारे दीड ते दोन कोटींचा ओला व सुका गांजा जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलिसांनी संयुक्तपणे केली.
शिरपूर तालुक्यातील रेकलीयापाणी धरण परिसरात गांजाच्या झाडांची लागवड झालेली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी मंगळवारी रेकलीयापाणी धरण परिसरात छापा टाकला. याठिकाणी धरणाच्या परिसरात दोन ते तीन एकर क्षेत्रावर पाच ते सात फूट उंचीचे गांजाची झाडे लागवड केल्याचे आढळून आले. तसेच धरणाच्या कडेला १०० ते १२० किलो सुका गांजा आढळून आला. यात सुमारे दीड ते दोन कोटींचा ओला व सुका गांजा जप्त कण्यात आला. पोलिस अधीक्षकांनीही घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.