धुळे : भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकाच्या बाजूस असलेल्या मोरीवर जोरदार धडकली. या अपघातात मध्य प्रदेशातील दोनजण ठार झाले. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील कलमाडी शिवारात शनिवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास झाला. अपघातात सुरज दिनेश घोडकी (वय २५, रा. इटावा, देवास मध्य प्रदेश), सुनील नारायण अवस्थी (वय २६, रा. पवननगर, इंदूर, मध्य प्रदेश) हे दोघे ठार झाले.
धुळ्याकडून इंदूरच्या दिशेने कार (क्र. एमआर २६-बीवाय२९६८) जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील कलमाडी शिवारात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार महामार्गावरील दुभाजकालगत असलेल्या मोरीला जोरदार धडकली. या अपघातात सुरज घोडकी, व सुनील अवस्थी हे दोघे तरुण ठार झाले. अपघातात कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी दिनेश घोडकी (वय ४८,रा. इटावा, मध्य प्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नरडाणा पोलिस स्टेशनला मयत चालक सुनील अवस्थी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक राम दिवे करीत आहेत.