देवेंद्र पाठक, धुळे : भरधाव वेगाने येणारी कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात १ जण ठार आणि दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे तालुक्यातील अकलाड फाटा येथे शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून फरार कारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला. धुळे तालुक्यातील लोणखेडी येथील बापू गोपीचंद ठाकरे, दादू बापू ठाकरे, राहुल भालचंद्र ठाकरे हे तिघे एमएच १८ एई २०६४ क्रमांकाच्या दुचाकीवर बसून अकलाड मोराणे येथे पांझरा नदी येथे खेकडा पकडण्यासाठी गेले होते.
अकलाड मोराणे येथून साक्री-धुळे रोडने लोणखेडी गावाकडे येत असताना जिभाऊ हॉटेलसमोर धुळ्याकडून साक्रीकडे जाणाऱ्या एमएच ४९ एएस १३२४ क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. अपघात इतका जोरात घडला की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. यात तिघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू होण्यापुर्वी बापू ठाकरे यांचा मृत्यू झाला. तर, दादू ठाकरे आणि राहुल ठाकरे या दोघांवर उपचार सुरू आहेत. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
याप्रकरणी देवानंद भालचंद्र ठाकरे (रा. लोणखेडी, ता. धुळे) यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, फरार कार चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील घटनेचा तपास करीत आहेत.