धुळे : एसटी महामंडळाच्या राज्यभरातील चालकांची ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी `अल्को टेस्ट` मशिनद्वारे तपासणी मोहिम राबविण्यात आली. यात तिन्ही पाळींमध्ये चालकांच्या केलेल्या तपासणीत राज्यभरातील विविध आगारातील तब्बल ४१ चालक हे मद्यप्राशन करून कामावर आले होते. अशा सर्व मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यावस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी `लोकमत`शी बोलतांना दिली.
राज्यातील अनेक आगारांमध्ये एसटीचे चालक हे मद्यपान करून वाहन चालवित असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. विशेषत : ज्या बस रात्री मुक्कामी जात असतात. अशा बस चालकांबाबत या तक्रारी अधिक असल्याचे आढळून आले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत एसटी महामंडळाचे व्यावस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी महामंडळाचे वाहतुक विभागाचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांना ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर असे दोन दिवस एकाचवेळी चालकांची `अल्को टेस्ट` मशिनद्वारे तपासणीमशिनद्वारे तपासणी मोहिम राबविण्याच्या सुचना केल्या होत्या. यासाठी विभागीय वाहतुक अधिकारी, सुरक्षा व दक्षता अधिकारी, आगार व्यवस्थापक यांना रात्रीच्या डियुट्या लावून, तपासणी मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एसटी चालकांची आगारात तसेच रस्त्यात अचानक बस थांबवून `अल्को टेस्ट` मशिनद्वारे तपासणी करण्यात आली. यात दोन दिवसात ४१ चालक दोषी आढळून आले आहेत.
एसटी चालकांनी मद्य प्राशन करून कामावर येणे, हा गंभीर गुन्हा आहे. यामुळे त्यांच्या हातुन अपघातही घडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशा चालकांविरोधात दोन दिवस तपासणी मोहिम राबविली असता, राज्यात ४१ चालक हे मद्यप्राशन केलेले आढळून आले आहेत. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून, निलंबनाचींही कारवाई करण्यात येणार आहे. शेखर चन्ने, उपाध्यक्ष तथा व्यावस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ.
खान्देशात आढळले १० कर्मचारी..
राज्यभरात एकाचवेळी राबविण्यात आलेल्या मोहिमेत एसटी महामंडळाच्या खान्देशातील धुळे व जळगाव विभागात १० चालक डियुटीवर असताना मद्यप्राशन केलेले आढळून आले आहेत. यातील धुळे विभागात ९ चालक दोषी आढळले असल्याचे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी सांगितले तर जळगाव विभागात चाळीसगाव आगारातील एक चालक दोषी आढळला असल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले. दोषी आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची परवानगींही नाकारली असल्याचे सांगण्यात आले.