धुळे : पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे काजवे पुलाच्या (लहान पूल) स्तंभाच्या मजबुतीसाठी चारही बाजुने क्रॉकीटीकरण करावे लागणार. तसेच पुलावरील संपूर्ण डांबरीकरण काढून नव्याने डांबरीकरण करावे लागणार असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेला सादर केला आहे. या पुलाची दुरूस्ती केव्हा होणार याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागलेले आहे. शहरातून देवपूर भागात जाण्यासाठी पांझरा नदीवर १९६५ मध्ये लहान पूल बांधण्यात आला. यालाच काजवे पूल म्हणतात. या पुलाचे स्तंभाचे बांधकाम हे दगडात झालेले आहे. या पुलावरून वाहनांची रात्री उशिरापर्यंत वर्दळ सुरू असते. दरम्यान ४ व ९ आॅगस्टला पांझरा नदीला आलेल्या महापुराचा फटका या लहान पुलाला बसला आहे. पुराचे पाणी पुलावरून गेल्याने, डांबरीकरण उखडलेले आहे. तसेच पुलाच्या स्लॅबच्या सळया उघड्या पडलेल्या आहेत. दरम्यान पुराच्या पाण्यामुळे पुलाच्या स्तंभाचे पायाजवळील रेती वाहून गेली. त्यामुळे काही ठिकाणी स्तंभ उघडे पडले, त्यांना तडा गेला आहे. पुरामुळे पुलाचे नुकसान झाल्याने, या पुलावरून बसवाहतूक गेल्या १५ दिवसांपासून बंद करण्यात आली असून, आता फक्त लहान वाहनांचीच या पुलावरून वाहतूक सुरू आहे. हा पूल महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या पुलाची पहाणी करून अहवाल द्यावा अशी विनंती महानगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला केली होती. त्यानुसार या पुलाची कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, उपअभियंता एजाज शहा, यांच्या सह या विभागाच्या अभियंत्यांनीही पुलाची पहाणी करून अहवाल तयार केला. पुरामुळे स्तंभाजवळील रेती वाहनू गेल्याने ते उघडे पडले आहेत. पुलाच्या मजबुतीसाठी त्याच्या चारही बाजुला क्रॉक्रीटीकरण करावे लागणार आहे. तसेच पुलाच्या स्लॅबच्या सळया उघड्या पडल्या असून, त्याठिकाणी गनायटींग करणे गरजेचे आहे. तसेच आतापर्यंत या पुलावर डांबरीकरणाचे थरावर थर देण्यात आल्याने, पुलावरील लोडही वाढलेला आहे. त्यामुळे पुलावरील सर्व डांबरीकरणाचे थर काढून टाकून फक्त चार सेंटीमीटरचे डांबरीकरण करणे गरजेचे असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महानगरपालिकेला सोपविण्यात आलेला असल्याचे अभियंता ए.बी.पाटील यांनी सांगितले. दुरूस्तीनंतर या पुलाचे आयुष्य आणखी दहा वर्षांनी वाढणार आहे.
काजवे पुलाच्या मजबुतीसाठी स्तंभाजवळ सिमेंट क्रॉँक्रिटीकरण, डांबरीकरण करावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:21 PM