आॅनलाइन लोकमत धुळे : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत केंद्रीय समितीकडून जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींची तपासणी नुकतीच करण्यात आली. समिती हा अहवाल केंद्राला सादर करणार आहे. सप्टेंबर मध्ये याचा निकाल जाहीर होऊन, उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा २ आॅक्टोबर रोजी सन्मान केला जाणार आहे.केंद्र शासनाकडून १ ते ३१ आॅगस्ट १८ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ (ग्रामीण) केले जात आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या समितीकडून ही पहाणी १६ ते १९ आॅगस्ट दरम्यान धुळे तालुक्यातील सावळदे, चांदे, गोताणे, शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा, चिमठाणे, रहिमपुरे, साक्री तालुक्यातील धनेर, जांभोरे, रूणमळी, तर शिरपूर तालुक्यातील उमर्दा, कोडीद या गावांमध्ये तपासणी करण्यात आली. केंद्र शासानने यापूर्वीच महापालिका क्षेत्रात अशाप्रकारे सर्वेक्षण केले होते. आता ग्रामीण भागात हे सर्वेक्षण केले जात आहे. स्वच्छतेबाबत जाणिव जागृती, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेतलेल्या कामांचे गुणात्मक व संख्यात्मक मानकांच्या आधारे गुणांकन ठरविणे हा मुख्य उद्देश आहे. संस्थेचे प्रतिनिधी महेश लोखंडे, प्रफुल्ल बोरीकर, आरती गोसटकर यांच्या पथकाने शाळा, अंगणवाडीची तपासणी केली. त्यात अंगणवाडीसेविका मदतनीस यांच्याशी संवाद, स्वच्छ सर्वेक्षणासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती, शौचालयांची पहाणी केली. या शिवाय ग्रामपंचायतीमधील १५ ते २० व्यक्तींशी स्वच्छ भारत मिशन यावर संवाद साधला. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय, धार्मिक स्थळ, पर्यटनस्थळ, या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था, गावातील परिसर स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदींची तपासणी केली. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ, सर्व गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,सरपंच, ग्रामसेवक , जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार, गटसंसाधन केंद्रातील कर्र्र्र्मचारी आदींचे सहकार्य लाभले. संस्थेने केलेले गुणांकन गोपनीय असून, निकाल सप्टेंबर २०१८ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे. उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा २ आॅक्टोबर अर्थात महात्मा गांधी जयंतीदिनी सन्मान होणार आहे.
केंद्रीय समितीकडून धुळे जिल्ह्यातील ११ गावांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:21 AM
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण : पथकाने शाळा, अंगणवाडी, गावातील स्वच्छतेची केली पहाणी
ठळक मुद्देजिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींची तपासणी पथकाने शाळा, अंगणवाडीची तपासणी केली. निकाल सप्टेंबर २०१८ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे