काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची आणि शिवसेनेची धूळदाण उडवत धुळे महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपाचे चंद्रकांत सोनार आज महापौरपदी विराजमान झाले आहेत. उपमहापौरपदी भाजपाच्याच कल्याणी अंपळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
१० डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात भाजपाला 'न भुतो' यश मिळालं होतं. ७४ पैकी ५० जागा जिंकण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेत सत्तेसाठी जशी अटीतटी रंगली, तशी इथे झाली नाही. महापौरपदाची आजची निवडणूक ही केवळ औपचारिकताच होती. महापौरपदासाठी चंद्रकांत सोनार आणि उपमहापौरपदासाठी कल्याणी अंपळकर यांची नावं भाजपाने निश्चित केली होती. राष्ट्रवादीतर्फे मंगल अर्जुन चौधरी यांनी अर्ज दाखल केला होता, तर काँग्रेसतर्फे खान सद्दीन हुसेन यांनी अर्ज भरला होता. परंतु, मतदानाआधीच त्यांनी आपले अर्ज मागे घेतले आणि चंद्रकांत सोनार महापौरपदी, तर कल्याणी अंपळकर उपमहापौरपदी विराजमान झाले.
धुळमुक्त शहर नवीन वर्षाची संकल्पना
निवडीनंतर नवनिर्वाचित महापौर चंद्रकांत सोनार यांनी निवड बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांचे आभार मानले. तसेच यापुढेही असेच सहकार्य विरोधकांकडून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त धुळमुक्त धुळे ही संकल्पना राबविणार असल्याचे महापौरांनी सांगितले.