आॅनलाइन लोकमतधुळे : ‘दैव देते मात्र कर्म नेते’ याचा अनुभव जिल्हा परिषदेच्या एका सदस्याला आला आहे. सभापतीपदासाठी भाजपच्या एका वरिष्ठ सदस्याने सोमवारी जिल्हा परिषदेत जाऊन दालनाची पहाणी केली.मात्र एकाच विभागाचा आग्रह धरून बसल्याने, त्या सदस्याला सभापतीपदालाही मुकावे लागले. ‘रात्रीस खेळ चाले राजकारणाचा’ याचा अनुभव या सदस्याला आला.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीनंतर विषय समिती सभापतीपदावर वर्णी लागावी यासाठी अनेकांनी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले होते. सभापतीपदी निवड करतांना अनुभवी व नवीन चेहरे असा समतोल राखण्याचा पक्ष श्रेष्ठींचा विचार होता. त्यामुळे धुळे तालुक्यातून एका अनुभवी सदस्याला सभापतीपदाची संधी देण्याचेही जवळपास निश्चित झाले होते. सभापतीपदावर वर्णी लागणार असा आत्मविश्वास असलेल्या ‘त्या’ज्येष्ठ सदस्याने सोमवारी जिल्हा परिषदेत जाऊन आपल्या मिळणाऱ्या संभाव्य दालनाचीही पहाणी केल्याची परिषदेचे कर्मचारी सांगतात.त्या सन्माननीय सदस्यांनी यापूर्वीही ते इच्छूक असलेल्या विषय समितीच्या सभापतीचा पदभार सांभाळलेला असल्याने, त्यांना पुन्हा तोच विभाग पाहिजे होता. त्यावर ते आग्रही होते. मात्र त्यांचा हा आग्रह पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांना अमान्य होता.त्यामुळे रात्रीतूनच चक्रे फिरली. पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचीही फोनाफानी झाली...अन ज्यांचे संभाव्य सभापती म्हणून नाव निश्चित झाले होते, त्यांच्या नावावर ‘फुली’ मारण्यात येऊन दुसºया एका अनुभवी सदस्यालाच सभापतीपदाची संधी देण्याचे निश्चित झाले. केवळ एकाच विभागाचा आग्रह कायम ठेवल्याने, त्या सदस्याला पदाला मुकावे लागल्याची जोरदार चर्चा सुरू होती.दरम्यान याबाबत भाजपच्या काही पदाधिकाºयांशी या संदर्भात चर्चा केली असता, असा कुठलाही प्रकार घडला नसल्याने त्यांनी सांगितले. मात्र घडलेल्या प्रकाराची जिल्हा परिषदेसह राजकीय क्षेत्रातही चर्चा सुरू आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ याचा अनुभव या सदस्याला आला.
दिवसा दालनाची केली पाहणी अन रात्रीतून पदाला मुकावे लागले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:51 AM