लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराला होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यासह कचरा संकलनाचा प्रश्न मंगळवारी झालेल्या महासभेत गाजला़ दूषित पाणी प्रश्न गांभिर्याने घेण्याची मागणी सदस्यांनी केली़ तर कचरा संकलनाच्या ठेक्यावरून प्रशासनाला जाब विचारण्यात आला़ महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर उमेर अन्सारी, नगरसचिव मनोज वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली़ सभेच्या सुरूवातीला दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली़ नगरसेवक अमिन पटेल यांच्यासह साबीर सैय्यद मोतेबर, प्रतिभा चौधरी, अमोल मासुळे यांनी प्रशासनाला दूषित पाणीपुरवठ्याचा जाब विचारला़ दूषित पाणीप्रश्न गांभिर्याने घेऊन कार्यवाही करावी व सक्षम अधिकारी, कर्मचाºयांनी नेमणूक पाणीपुरवठ्यासाठी करावी, असे आदेश महापौर कल्पना महाले यांनी प्रशासनाला दिले़ नगरसेवक कैलास चौधरी, नरेंद्र परदेशी, मनोज मोरे, संजय जाधव, साबीर सैय्यद यांनी देखील कचरा संकलनावरून प्रशासनाला जाब विचारला़ शहरातील जनता आयुक्तांना कचराशेठ म्हणून ओळखू लागल्याचा आरोप नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी केला़ त्यानंतर २०१२-१३ च्या लेखापरीक्षण अहवालावर चर्चा झाली़ विभागप्रमुखांना प्रत्येक आक्षेपावर खुलासा करावा लागणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले़ उर्वरीत विषय मंजूर करण्यात आले़ शहरातील शासकीय ग्रंथालयासाठी जागेचे आरक्षण बदलण्याच्या विषयावरून नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी आमदारांवर टिका केली़ बेकायदेशिर कामांमुळे शहरात होणारी चर्चा हेच आमदारांचे भांडवल असल्याचे ते म्हणाले़ तसेच सद्यस्थितीत प्रस्तावित जागेवर उद्यानाचे आरक्षण असतांना काम सुरू झालेच कसे? असा जाबही त्यांनी विचारला़ सार्वजनिक बांधकाम विभागाला बांधकाम परवानगी नाकारली असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले़ अखेर हा विषय महापौरांनी तहकूब केला़ संबंधित विषयावर साबीर सैय्यद, मनोज मोरे यांनी देखील परदेशी यांच्या भुमिकेला समर्थन दिले़
धुळे मनपा महासभेत दूषित पाणीपुरवठ्यासह कचरा संकलनावरून चिखलफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 4:31 PM
आमदारांवर टिकास्त्र, जिल्हा ग्रंथालय जागेच्या आरक्षणाचा विषय बारगळला
ठळक मुद्दे- कचरा संकलनात अधिकारीच हिस्सेदार असल्याची टिका - शहरातील चर्चा हेच आमदारांचे भांडवल असल्याचा आरोप- लेखापरीक्षण अहवाल मनपाची सामुहीक जबाबदारी