या मंडळातर्फे दहावी ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणाऱ्या कामगाराच्या पाल्यांना वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येत असते. यात दहावी, अकरावी, १२वीपर्यंत दोन हजार रुपये, १३ वी ते १५ वीपर्यंत २५०० रुपये, दहावीनंतर डिप्लोमा केल्यास ३ हजार रुपये तर १२ वीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला ५ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. सर्वसाधारण शिष्यवृत्तीसाठी नववीपासून किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. तर अपंगांसाठी टक्केवारीची अट ठेवण्यात आलेली नाही.
याशिवाय पाठ्यपुस्तक घेण्यासाठीही या मंडळातर्फे सहाय्य मिळत असते. ११ वीपासून पुढे क्रमिक पुस्तकांच्या ५० टक्के रक्कम मिळत असते.
या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी कामगाराने कामगार कल्याण मंडळाचे सभासद असणे गरजेचे आहे. कामगारासाठी वार्षिक सभासद फी १५ रुपये तर कुटुंबीयांसाठी २० रुपये असते. धुळ्यात जवळपास ५५०० सभासद आहेत. दरम्यान, ज्या कामगारांच्या खात्यातून प्रत्येक वर्षाच्या जून व डिसेंबर महिन्यात कामगार कल्याण निधी कपात होत असतो, त्यांच्याच पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत असतो.
धुळे जिल्ह्यात धुळ्यात दोन, शिरपूरला एक कामगार कल्याण मंडळ असून, दोंडाईचात कामगार भवन आहे. धुळे जिल्ह्यात २०१९-२० या आर्थिक वर्षात ५०० विद्यार्थ्यांना १३ लाख ५०० हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. तर २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जवळपास ३२५ विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले असून, त्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाईल. शिष्यवृत्तीची एकत्रित रक्कम ८ ते १० लाखांपर्यंत असेल असेही सांगण्यात आले.
गंभीर आजार असणाऱ्यांनाही मदत
गंभीर आजार असलेल्या कामगारांनाही या मंडळातर्फे अनुदान देण्यात येत असते. साधारत: पाच हजारांपासून २५ हजार रुपयांपर्यंत मदत करण्यात येत असते. २०१९-२० या वर्षात १६ कामगारांना ४ लाखांपर्यंत तर २०२०-२१ या वर्षात ५ जणांना एक लाखांपर्यंत मदत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या योजनेचा लाभ एस.टी. महामंडळ, एमएसईबी, कृउबा, इन्शुरन्स कंपन्या, हॉस्पिटल्स, दुकाने, एलआयसी, बॅँका, पतसंस्था, महाबीज महामंडळ, वर्कशॉप, साखर कारखाना तसेच एमआयडीसी क्षेत्रातील सर्व कंपन्या, कारखाने, विविध कार्यालयांत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना याचा लाभ मिळत असतो.