धुळे : शहरातील मिल परिसर भागातील प्रभाग क्र. १७ मधील अजळकरनगरात गेल्या वर्षभरापासून रस्ते, गटारी अस्वच्छ, पथदिवे बंद तसेच घंटागाडी येत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मनपाच्या सभांमध्ये अनेकवेळा येथील नगरसेवक आक्रमक तसेच विकासाचे मुद्दे मांडतात, मात्र तसे काम होताना दिसून येत नाही. प्रभाग क्र. १७ मधील नागरिकांच्या समस्या येथील अभ्यासू नगरसेवकांना दिसत नाही का, असा सवाल मिल परिसर शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
या भागात गेल्या अनेक वर्षांपासून कुठलेही विकासकाम झालेले नाही. रस्ते, गटारी, पथदिवे बंद तसेच घंटागाडीही येत नाही. या प्रभागातील नगरसेवक अभ्यासू आहेत. प्रत्येक महासभेत स्थायीच्या सभेत त्यांचाच आवाज वर्तमानपत्रात छापून येतो. मग असे असतानाही गेल्या सव्वादोन वर्षांत या नगरसेवकांना आपल्या प्रभागातील अजळकरनगर परिसरातील समस्या का सोडविता आल्या नाहीत, अजळकरनगर भागात सुविधांचा अभाव आहे. मनपा प्रशासन या नगरसेवकांचे ऐकत नाही का, असे प्रश्न शिवसेनेने उपस्थित केले आहे. प्रशासनाला जागे करून प्रशासनाने या परिसराकडे लक्ष देऊन विकासकामांना चालना द्यावी, या मागणीसाठी साहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी यांना शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप चव्हाण, उपविभागप्रमुख सतीश गिरमकर यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी उपविभागप्रमुख शेखर बडगुजर, नीलेश वाघमोडे व लखन चौगुले, गटप्रमुख किसन गवळी, सोनवणे काका, बापू बडगुजर, बापू शिंपी, वाल्मिक गिरमकर, रवींद्र मोरे, रवींद्र पांडे, केशव पाटील, वामन मोहिते, ईश्वर बोरसे, शांताराम वाडेकर यांच्यासह अनेक अजळकरनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.