लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. शासकीय कार्यालये सुरू असली तरी संचारबंदीमुळे नागरिक बाहेर पडत नाही. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी व्यवहारासाठी आॅनलाइन सुविधांचा अवलंब केलेला आहे. विविध बिले भरण्यासाठी या सुविधेचा उपयोग होत आहे. तर ग्रामीण भागात नाती जपण्यासाठी व्हिडीओ कॉलिंग सुविधेचाही वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.बाजारात, दुकानात जाऊन खरेदी तर विज वितरण, टेलिफोन आदी कार्यालयांमध्ये जाऊन बिले भरण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी २३ मार्चपासून राज्यात लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.त्यामुळे विविध कंपन्यांचे व्यवहार ठप्प पडलेले आहेत. कुरिअर सेवाही ठप्प झालेली आहे. अशावेळी घरात बसूनच सर्व गोष्टींची तजवीज कशी करायची असा प्रश्न अनेकांना सुरवातीला पडला होता. मात्र आता स्मार्ट फोनच्या साह्याने होत असलेल्या आॅनलाइन व्यवहारानेच त्यासाठीचा मार्ग शोधून काढला आहे.मित्र, नातेवाईक व व्यवहारासाठी पैसे पाठविण्यासाठी बॅँकेत जाणे टाळून घरूनच आॅनलाइन व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रीक बिल, टेलिफोन बिल, मोबाईल रिचार्ज आदी गोेष्टींसाठी आता आॅनलाइनचाच वापर होऊ लागला आहे.व्हीडिओ कॉलिंगचे प्रमाण वाढलेसध्या राज्यासह देशातच संचारबंदी लागू करण्यात आल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. त्यामुळे कोणाचेच नातेवाईकांकडे जाणे-येणे होत नाही. अशा स्थितीत ग्रामीण भागातील नातेवाईकही व्हीडीओ कॉल करून आपल्या आप्तेष्टांची आस्थेवाईक विचारपूस करतांना दिसतात. प्रत्यक्ष जाणे होत नसले तरी व्हिडीओ कॉलद्वारे प्रत्यक्ष चेहरे दिसत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात स्मार्ट फोन अनेकांसाठी एक वरदान ठरू लागला आहे.
आॅनलाइन व्यवहाराकडे नागरिकांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:04 PM