धुळे : एका कारमधून अवैध दारु धुळ्यात बेकायदेशीररित्या येणार असल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने कुमारनगर भागात सापळा लावला़ कार येताच तिची तपासणी केली असता त्यात अवैध दारु आढळून आल्याने कारसह ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ ही कारवाई रविवारी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़ यात दोघांना ताब्यात घेण्यात आले़साक्री रोडवरील कुमारनगर भागात एक कार येणार असून त्यात दारुचा बेकायदेशीर साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानुसार रविवारी पहाटे १२ वाजेच्या सुमारास शहर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला़ एमएच १८ बीसी ३९२८ क्रमांकाची कार येताच ती अडविण्यात आली़ कारमध्ये काय आहे याची विचारणा केल्यानंतर उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आल्याने पोलिसांना संशय अधिकच बळावला़ कारची तपासणी केली असता त्यात दारुच्या बाटल्यांचे खोके आढळून आले़ ११ हजार २१० रुपयांची दारु आणि ६ लाखांची कार असा एकूण ६ लाख ११ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे़ याप्रकरणी कारचालक गोपाल सोमनाथ चौधरी (२९, रा़ कुसुंबा ता़ धुळे) आणि त्याच्यासोबत लक्ष्मण नारुमल लुल्ला (५१, रा़ कुमारनगर, साक्री रोड धुळे) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, एऩ एस़ आखाडे, पोलीस कर्मचारी मुक्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, राहुल पाटील, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे़
शहर पोलिसांनी पकडली अवैध दारु कारसह ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 8:36 PM