धुळे : शहरातील वाखारकर नगरात मंगळवारी गोरक्षकांनी गुरांचे वाहन पकडल्यानंतर गोरक्षक आणि वाहनातील दाेघे यांच्यात हाणामारी झाली. यात दोन जण जखमी झाले. याप्रकरणी परस्पर फिर्यादीवरून आझादनगर पोलिस स्टेशनला सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रणील मंडलिक (वय २६, रा. मंगलनगर, साक्री रोड धुळे) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, साक्री येथून एका वाहनातून गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तो मित्रांसह वाखारकर नगर येथे उभे असताना, त्या ठिकाणी दोघांनी येत त्यांना शिवीगाळ करीत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी खुर्ची कपाळावर मारून जखमी केले. म्हणून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलिस नाईक अतुल वाघ करीत आहेत.
तर परस्परविरोधात फिर्याद करीम अय्युब खान (वय २९, रा. शिवाजी झोपडपट्टी, धुळे) याने दिली. त्यात म्हटले आहे की, एमएच ३१-सीक्यू ५२१२ या वाहनातून बाजार समितीतून विकत घेतलेली गुरे घेऊन जात असताना संशय घेत संशयित आरोपींनी त्याचे वाहन वाखारकरनगरजवळ अडविले. आरोपींनी गाडीतून उतरवून चाकूने वार करीत जखमी केले. तसेच चाकूच्या साह्याने वाहनाचे तीनही टायर पंक्चर करून नुकसान केले. यावरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक एम. एम. नवगिरे करीत आहेत. घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक पोवरा यांनी भेट दिली.