देवेंद्र पाठक, धुळे : क्षुल्लक कारणावरून दाेन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सोनगीर गावात बुधवारी घडली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात शनिवारी परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने २८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एका गटाकडून गोपाल आत्माराम माळी (वय २५, रा. सावता चौक, सोनगीर) यांनी फिर्याद दाखल केली.
त्यानुसार, शेतातून घरी येत असताना रस्त्यात मोटारसायकल लावलेली होती. लावलेली मोटारसायकल बाजूला घेण्यास सांगितले. सोनगीर गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यामुळे वाद निर्माण झाला. शाब्दिक चकमक उडाली. शिवीगाळ करण्यात आली. गर्दी जमा करून लाठ्या काठ्यांसह कोयता आणि चाकूने हल्ला करण्यात आला. धारदार शस्त्राने मारल्याने गंभीर दुखापत करण्यात आली. शिवाय जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जखमी अवस्थेत गोपाल माळी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केल्याने १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या गटाकडून योगेश ऊर्फ कन्हैया चौधरी (वय २६, रा. सोनगीर) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार लहान मुलांचे किरकोळ भांडण सोडवत असताना तू या भानगडीत पडू नको, तुझा काय संबंध, असे बोलल्यानंतर माझी काय चूक, असे बोलल्याचा राग आल्याने तरुणाला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. यावेळी गर्दी जमा करत लाठ्या-काठ्यांसह लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री १० ते साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. यात जखमी झाल्याने योगेश चौधरी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत. याप्रकरणी १२ जणांविरोधात शनिवारी दुपारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. घटनेचा तपास सुरू आहे.