धुळे :
शिंदखेडा तालुक्यातील विटाई येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ३ रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी ४ एप्रिल रोजी दोन्ही गटांतर्फे परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली असून, नरडाणा पोलिसात दोन्ही गटातील ९१ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल रवींद्र खैरनार (वय २८, रा. चक्की गल्ली, विटाई) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मागील भांडणाची कुरापत काढून संशयित आरोपींनी जमाव जमवून शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच दोघांनी २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने ओढून घेतली. याप्रकरणी ४१ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक राम दिवे हे करीत आहेत.
तर पुष्पा अशोक पवार (वय ५०, रा. चक्की गल्ली, विटाई) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, गावातील पाण्याच्या ओहोळाजवळील सार्वजनिक स्वच्छतागृह मिटींग न घेताच काढून टाकले याची चर्चा करीत असताना संशयित आरोपींना वाटले आपल्याबद्दल बोलत आहेत. या संशयावरून संशयित आरोपींनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. या हाणामारीत आरोपींनी तरुणाच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन ओढून घेतली. याप्रकरणी ५० जणांविरूद्ध नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज कुवर करीत आहेत.