सुनील साळुंखे
शिरपूर (धुळे) : गिऱ्हाईकावरून दोन मेडिकल चालकांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना शहरातील नगरपालिका हॅास्पिटल परिसरात मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या हाणामारीत दोनजण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटातर्फे परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली असून, दोन्ही गटातील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी राजपाल उजैनसिंग गिरासे (वय १९, रादौलत नगर, शिंगावे शिवार, ता. शिरपूर) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपींनी तू आमचे पेशंट का घेऊन जात आहे असे विचारले असता, राजपाल याने सांगितले की, ते पेशंट आमचे आहेत. त्यांच्याकडे माझे बिल असून, ते घेण्यासाठी आलो आहे. याचा त्यांना राग आल्याने, संशयित आरोपींपैकी एकाने राजपाल याला हातातील लोखंडी पाईपाच्या साह्याने डोक्यावर मारहाण केली. तर दुसऱ्याने लोखंडी दांड्याने मानेवर वार करून दुखापत केले. तसेच संशयित आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरून चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एन. के.पाटील करीत आहे.
सुनील पांडुरंग माळी (वय २४, रा. जनतानगर, शिरपूर) याने परस्परविरोधी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, आरोपींनी गिऱ्हाईकाला सांगितले की तुम्ही दुसऱ्या मेडीकलवरून औषधी घ्या. तेव्हा सुनील माळी याने त्या मेडीकल चालकाला सांगितले की गिऱ्हाईकला जिथे पाहिजे तेथून औषधी घेऊ द्या. याचा त्यांना राग आल्याने, एकाने त्याच्या हातातील कात्रीने सुनील याच्यावर वार केला. तर दुसऱ्याने लाकडी दांड्याने पाठीवर, हातापायावर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पोलिस नाईक सोनवणे करीत आहेत.