दोंडाईचा-पावसाळ्यापूर्वी नदी, नाले, मोठ्या गटारी सफाईसह विविध विषयांवर चर्चा होऊन, तत्काळ कामे करण्याच्या सूचना नगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
आमदार जयकुमार रावल आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य विभागाची आढावा बैठक नगरपालिका सभागृहात घेण्यात आली. यावेळी पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे स्वच्छतेच्या अनेक समस्या उद्भवत असल्याने, शहरातील अमरावती व भोगावती या दोन्ही नदीपात्रांतील काटेरी बाभळाची झुडपे काढून नदीपात्र स्वच्छ करावे, शहरातील नाले आणि मोठ्या गटारी साफ कराव्यात, अनेक ठिकाणी व्ही गटारी टाकणे, आवश्यक ठिकाणी सिमेंट काँक्रिटचे पाइप टाकावे, तसेच पावसाळ्यात विजेची समस्या मोठ्या प्रमाणावर येत असल्याने, अनेक वेळा रात्री लाइट बंद होण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अंधारात विषारी कीटक, विंचू आणि साप यांचाही त्रास नागरिकांना होत असतो. रात्री-अपरात्री लाइट बंदच्या समस्या निर्माण होत असल्याने, संबंधित एजन्सीकडून जास्तीचे लाइट मागविणे आदी विविध विषयांवर चर्चा होऊन, त्यावर तत्काळ कामाला सुरुवात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीस उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम, स्वच्छता व आरोग्य सभापती प्रतिनिधी कृष्णा नगराळे, माजी पाणीपुरवठा सभापती नगरसेवक संजय तावडे, माजी आरोग्य सभापती नगरसेवक जितेंद्र गिरासे, नगरसेवक हितेंद्र महाले, खलिल बागवान, सामाजिक कार्यकर्ते सलाम शाह, आरोग्य निरीक्षक शरद महाजन, पाणीपुरवठा अभियंता प्रकाश जावरे, इलेक्ट्रिक विभाग प्रमुख हर्षल ढवळे, बांधकाम विभागाचे सुधीर माळी, प्रभागनिहाय नेमण्यात आलेले मुकादम रघुनाथ बैसाणे, कांतीलाल मोहिते, राजेंद्र चौधरी, गुलाब नगराळे, आकाश कांबळे, जनसेवा फाउंडेशन सफाई ठेक्याचे सुपरवायझर कुमार प्रभू आदी उपस्थित होते.