लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेच्या सत्तेची सुत्रे स्विकारल्यानंतर भाजपतर्फे मंगळवारी ‘धुळमुक्त धुळे’ या स्वच्छता संकल्पनेचा शुभारंभ करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले़ महापौर चंद्रकांत सोनार, महानगरप्रमुख अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले़ महापालिकेची प्रतिमा सुधारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार यांनी केले़महापौर चंद्रकांत सोनार व उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी पदाची सुत्रे स्विकारताच कामकाजास सुरूवात केली़ नववर्षाचे औचित्य साधून सकाळी ७़३० वाजता आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांच्या उपस्थितीत भाजपचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत ‘धुळमुक्त धुळे’ या स्वच्छता कार्यक्रमाचा शुभारंभ झाला़ धूळ मुक्त धुळे अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापालिका आवारासह गुरुशिष्य स्मारक, राजवाडे बँक परिसर, महाराणा प्रताप चौक, संतोषी माता चौकात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. याप्रसंगी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त रविंद्र जाधव, आरोग्याधिकारी डॉ.बी.बी.माळी, भाजप सरचिटणीस हिरामण गवळी, माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्यासह नवनियुक्त नगरसेवक उपस्थित होते. दर महिन्याला १ ते ७ जानेवारीपर्यंत ही विशेष मोहिम राबवली जाणार आहे.शहरातील रस्ते, प्रमुख चौक, वस्त्या झाडून स्वच्छ करण्यात येतील. जेणेकरून उडणारी धूळ साफ होऊन नागरिकांच्या आरोग्याला होणारा त्रास आणि धुळ पसरणारी अस्वच्छता दूर होईल, हा मुख्य हेतू या अभियानाचा आहे़मनपाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत-महापौरस्वच्छ सर्वेक्षणात धुळे शहर देशातील पहिल्या ५० शहरांच्या यादीत समाविष्ट व्हावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. यात सर्व स्वच्छता कर्मचारी आणि नागरिकांची साथ मिळाली, तर पहिल्या ५० नव्हे तर २५ शहरांच्या यादीमध्ये धुळ्याचा नक्की समावेश होईल. नवीन वर्षाची सुरुवात आपण स्वच्छतेने करायची आहे. मनापासून या कामात सर्वांनी सामील व महापालिकेची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार यांनी केले़स्वच्छतेच्या ठेक्यात कुणाची ढवळाढवळ नाही-अग्रवाल‘धुळमुक्त धुळे’ अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी बोलतांना भाजपचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल म्हणाले की, दर महिन्याच्या १ ते ७ तारखेला ही विशेष स्वच्छता मोहिम राबवायची आहे. त्याबाबतच्या नियोजनानुसार दिलेल्या तारखेला त्या त्या प्रभागाच्या नगरसेवक, नागरिकांनी सहभागी व्हावे़ मनपाच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी १७ कोटी रूपयांची निविदा काढण्यात आली आहे़ हा ठेका चांगल्या कंपनीला दिला जाईल. इंदौर शहराप्रमाणे बाहेरच्या कंपनीकडून शहर स्वच्छतेचे काम करून घेतले जाणार आहे.शिवाय ठेका देतांना यापूर्वी जसे स्थानिक लोक ढवळाढवळ करायचे, भागिदारी करायचे तसा प्रकार आता होऊ देणार नाही. कचरामुक्त, धुळमुक्त शहर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे अग्रवाल म्हणाले़
स्वच्छता मोहिमेने नववर्षाचे स्वागत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 9:56 PM