धुळे : दीर्घ प्रतीक्षेनंतर मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळालेली आहे. रेल्वे मार्गासाठी जमिनीची मोजणी प्रक्रिया सुरू झालेली असून, पहिल्या टप्प्यात धुळे तालुक्यातील बोरविहिर ते नरडाणापर्यंत रोव्हरचा वापर करून जमिनीची मोजणी करण्यात आली. यात धुळे तालुक्यातील २० गावांपैकी ११ गावांतील मोजणीचे काम पूर्ण झालेले आहे. लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येईल असे सांगण्यात आले.
मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने मंजुरी दिली. पिंक बुकमध्ये त्याची नोंदणी करण्यात आली. या रेल्वे मार्गासाठी खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. धुळे तालुक्यातून सुमारे ४० किलोमीटरचा हा मार्ग जाणार आहे. पहिला टप्पा बोरविहिर ते नरडाणा असा आहे.
ऑगस्टपासून जागेची मोजणी सुरू झाली. मात्र काही कारणास्तव ही प्रक्रिया लांबली. नंतर नोव्हेंबरपासून ही प्रकिया पुन्हा सुरू झाली. धुळे तालुक्यात २० गावांमध्ये जमीन मोजणीचे २२ प्रस्ताव होते. त्यानुसार २११.६ हेक्टर आर जमिनीची मोजणी पूर्ण झाली. ही मोजणी रोव्हरच्या साह्याने करण्यात आली. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रात प्रथमच अक्षांश, रेखांशासह ही मोजणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे या मोजणीवर कोणाचेही आक्षेप नाही. तसेच मोजणी बाबत कोणीही तक्रार केलेली नाही. जमीन मोजणीचे काम अतिशय पारदर्शकपणे झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे.