धुळे, दि.11- तालुक्यातील शिरूड जि.प. गटाचे कॉँग्रेसचे सदस्य विष्णू वना भिल यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. मात्र माघारीच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवार भागाबाई वसंत कुवर यांनी माघार घेतल्याने कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवार नर्मदाबाई विष्णू भिल या बिनविरोध विजयी ठरल्या आहेत.
अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत या पोटनिवडणुकीसाठी 3 अर्ज दाखल झाले. कॉँग्रेस पक्षाने दिवंगत सदस्य विष्णू भिल यांच्या प}ी नर्मदाबाई भिल यांनाच उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे भागाबाई वसंत कुवर यांना व भारतीय जनता पक्षातर्फे पांडुरंग धुडकू मोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेनेने मात्र या ठिकाणी सहानुभूतीच्या भावनेतून आपला उमेदवार दिला नव्हता.
6 रोजी झालेल्या छाननीत भाजपचे उमेदवार पांडुरंग धुडकू मोरे यांचा अर्ज बाद ठरला होता. त्यामुळे कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवार नर्मदाबाई विष्णू भिल व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवार भागाबाई वसंत कुवर या दोघीच या पोटनिवडणुकीच्या रिंगणात होत्या. 11 एप्रिलर्पयत माघारीसाठी मुदत आहे. या निवडणुकीसाठी 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार होते. परंतु माघारीच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवार भागाबाई वसंत कुवर यांनी माघार घेतली.