देवेंद्र पाठक,धुळे : महामार्गावर उसाचे ट्रॅक्टर पलटी झाल्यानंतर पोलिस दप्तरी नोंद न करण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. ही लाच स्वीकारताना हवालदार रवींद्र मोराणीस याला बुधवारी रात्री पावणेअकरा वाजता रंगेहाथ पकडण्यात आले. ही लाच पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील यांच्या वतीने हवालदार रवींद्र मोराणीस याने स्वीकारली. ही घटना देवपूर पोलिस ठाण्यात घडली असून, दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
तक्रारदार यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरमध्ये ऊस भरुन चोपडा तालुक्यातील सत्रासेन येथून शिरपूर-धुळे मार्गे रावळगाव साखर कारखाना येथे वाहतूक करीत होते. त्यांचे ट्रॅक्टर धुळे शहरातील महामार्गावरील उड्डाणपुलावर १५ जानेवारीला उलटले होते. त्यानंतर देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील यांनी तक्रारदार यांना १६ जानेवारी रोजी देवपूर पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर मोटार वाहतुकीचा गुन्हा दाखल न करता ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून तक्रार दाखल केली.
या तक्रारीची पडताळणी १७ जानेवारी रोजी करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम पोलिस हवालदार रवींद्र मोराणीस यांना भेटून देण्याचे सांगितले. देवपूर पोलिस ठाण्यातच ही रक्कम स्वीकारल्याने रवींद्र माेराणीस याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही रक्कम पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील यांनी घेण्यास सांगितल्याने त्यांनाही अटक करण्यात आली.
पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी व पथकातील पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, मंजितसिंग चव्हाण, कर्मचारी राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रशांत बागुल, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर या पथकाने ही कारवाई केेली.