सुनील साळुंखे
शिरपूर (जि.धुळे) : येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश साहेबराव भदाणे हे कार्यालयीन दिवशीही उपस्थित राहत नाही, मासिक बैठकीला दांडी मारतात, अनेकवेळा कारणे दाखवा नोटीस देऊन देखील कामात सुधारणा न झाल्याने, मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी भदाणेंचा पदभार काढून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. त्यांच्या जागी धुळ्याचे सुनील लक्ष्मण साळुंखे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचा आदेश येथील पंचायत समितीला प्राप्त झाला.
येथील पंचायत समितीचे उपअभियंता महेश साहेबराव भदाणे हे २९ एप्रिल २०२२ पासून सेवेत हजर झाले आहेत. त्यांच्या सेवा कालावधीत त्यांना अनेकवेळा कारणे दाखवा नोटीस देखील देण्यात आलेल्या आहेत. तरी देखील त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली दिसून आली नाही. सद्यस्थितीत बांधकाम विभागात सन २०२२-२३ चे उद्दिष्ट सन २०२१-२२ चे राहिलेले उद्दिष्ट पूर्ण करावयाचे असल्याने त्याबाबत प्रशासन प्रयत्न करीत आहेत. परंतु उपअभियंता भदाणे हे कार्यालयात उपस्थित न राहणे, दूरध्वनी बंद करून ठेवणे तसेच सतत कार्यालयात गैरहजर राहत असल्याने विकासाची कामे ठप्प झालेली आहेत. तसेच येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीला सुद्धा वारंवार दांड्या मारणे, त्यामुळे नागरिकांची कामे होत नसल्यामुळे तक्रारी वाढल्या होत्या. या कारणास्तव त्यांचा पदभार काढून टाकण्यात आला. त्यांच्या जागी सुनील लक्ष्मण साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली.