मालपूर(जि. धुळे): देशात जवळपास १०० कोटी जनतेला लसीकरण केल्याचा दावा केला जात असताना आरोग्य विभागाचा लसीकरणाबाबत असलेला सावळागोंधळही चव्हाट्यावर येऊ लागला आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे सहा महिन्यांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या मोबाईलवर त्यांनी १९ ऑक्टोबर २०२१ रोजी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज प्राप्त झाला. या प्रकारामुळे मृताचे कुटुंबीयही अचंबित झालेले असून, लसीकरणाची संख्या वाढविण्याचा हा प्रकार तर नाही ना? अशी चर्चा गावात सुरू झालेली आहे. येथील बन्सिलाल सुका धनराळे (६६) यांनी १० मार्च २१ रोजी लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता. मात्र, ६ एप्रिल २१ रोजी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यूला सहा महिने झाल्यानंतर बन्सीलाल धनराळे यांनी १९ ॲाक्टोबर २१ रोजी कोरोनाचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. त्यांचा मुलगा विनोद धनराळे यांनी मेसेजवरून लसीकरणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड केले असता, त्यावर दोन्ही डोस घेतल्याच्या तारखा नमूद आहेत. दुसरा डोस त्यांनी मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतल्याचे नमूद आहे. झाली ती चूकच अनावधनाने धनराळे यांचा मोबाईल नंबर टाकला गेला. दुसऱ्या कर्मचाऱ्याने तो व्हेरिफाय केल्याने रजिस्ट्रेशन झाले. झालेली ती चूकच आहे.-डाॅ. हितेंद्र पाटील, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मालपूर
Corona Vaccination: सावळागोंधळ! धुळ्यात मृत व्यक्तीला दिला कोरोना लसीचा दुसरा डोस; कुटुंबीय अचंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 7:24 AM