लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना उद्घाटनासाठी देण्यात आलेले निमंत्रण रद्द केल्याने वाद निर्माण झाला आहे़ या प्रकरणी साहित्य महामंडळाची यवतमाळ शाखा दोषी असेल तर महामंडळाने साहित्य संमेलन रद्द करायला हवे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक अनिल सोनार यांनी व्यक्त केले़ सोनार यांची विशेष मुलाखत त्यांच्या शब्दात़़़प्रश्न- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्भवलेल्या वादाबद्दल आपणास काय वाटते?अनिल सोनार- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी हे अत्यंत चांगले साहित्यिक असून त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जाण आहे़ माझे व त्यांचे गेल्या ४० वर्षांपासून संबंध आहेत़ साहित्य महामंडळाच्या यवतमाळ शाखेने परस्पर सहगल यांना निमंत्रण रद्द केल्याचे पत्र पाठविले, असे जोशी यांनी म्हटले आहे़ पण वाद निर्माण होईल, याची कल्पना असतांना कार्यकारिणीला न विचारता असा निर्णय परस्पर होईल, हे पटत नाही़ परंतु जर तसे झालेच असेल तर यवतमाळला होणारे साहित्य संमेलन महामंडळाने रद्द करायला हवे व काही दिवसांनंतर अन्य ठिकाणी आयोजन करायला हवे़प्रश्न- सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार टाकणे योग्य वाटते का?अनिल सोनार- माझा सहगल यांच्याशी कधी संबंध आला नाही पण त्या जागतिक ख्यातीच्या लेखिका आहेत़ तोलामोलाच्या साहित्यिकाचा असा अपमान होता कामा नये़ जिथे स्वातंत्र्य मुल्यांची जोपासना होत नसेल तिथे जाणे योग्य नाही़ कलावंत हा संवेदनशिल असतो, त्यामुळे तो पेटून उठतो़ ज्यांना निमंत्रण आहे, त्यांनीही संमेलनावर बहिष्कार टाकायला हवा़प्रश्न- आपण स्वत: साहित्य संमेलनाला जाणार का?अनिल सोनार- नवोदित साहित्यिक, रसिकांनी साहित्य संमेलनास जाऊ नये, बहिष्कार टाकावा असे आवाहन मी करीत आहे़ त्यामुळे मी स्वत: जाण्याचा प्रश्नच येत नाही़ साहित्य संमेलनात जर स्वातंत्र्य मुल्यांची जोपासना केली जात नसेल तर साहित्य संमेलन घेऊच नये असे मला वाटते़
तर महामंडळाने साहित्य संमेलनच रद्द करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 9:58 PM