लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर (ता. शिंदखेडा, जि. धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची मदार अमरावती मध्यम प्रकल्पावर आहे. मात्र, या प्रकल्पातील मृतसाठा संपण्याच्या मार्गावर आला आहे. येथील परिसरात यंदा कापसाच्या लागवडीचे क्षेत्र घटणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच कापूस लागवडीचे नियोजन आता पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून मालपूर भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. यावर्षी अमरावती मध्यम प्रकल्पाने प्रथमच येवढा तळ गाठल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या प्रकल्पात आता चक्क पाण्याचे डबके साचल्याचे दिसून येत आहे. त्या डबक्यातील जलसाठाही संपण्याच्या स्थितीत आहे. दरवर्षी मे महिन्यात कापूस लागवड येथील परिसरात केली जात होती. मात्र, पाणी नसल्याने कापूस लागवड लांबणीवर पडली आहे. चैत्र महिन्याच्या शेवटी गावात असलेल्या यात्रेनिमित्त प्रकल्पातील सांडव्यात पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीकाठावरील विहिरींचा जलस्त्रोत वाढत होता. तसेच काही शेतकºयांना पाणी उपसा करण्याच्या परवानगी दिल्यामुळे मोटार जलवाहिनीद्वारे शेतात पाणी उपलब्ध होत होते. तसेच उजव्या व डाव्या कालव्यातून आवर्तने होत असल्यामुळे मालपूरसह सुराय, कलवाडे, कर्ले, वैंदाणे, खर्दे, मांडळ, मोयाणे, चुडाणे आदी गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड होताना पाहावयास मिळत होती. मात्र, सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने कापूस लागवड लांबणीवर जाऊन पावसाच्या पाण्यावरच लागवडीचे नियोजन करता येणार आहे.
१२ वर्षांपासून प्रकल्प भरला नाही पावसाच्या पाण्यावरच येथील अमरावती मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्याची परिस्थिती गेल्या १२ वर्षांपासून दिसून येत आहे. मालपूरसह परिसरातील गावांसाठी अमरावती, मध्यम प्रकल्प व्यतिरीक्त दुसरा जलस्त्रोत नाही; त्यामुळे मालपूरसह लगतच्या संपूर्ण परिसरात पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ व शेतकºयांना करावा लागत आहे.