निजामपूर : महिन्याभराच्या अंतरानंतर डरकाळ्या फोडणारा बिबट्या पुन्हा सक्रिय झाला आहे. धुळे जिल्ह्यातील डोमकानी (ता.साक्री) शिवारात असलेल्या वासखेडी येथील शेतकरी उमेश शामराव दहिते यांचे शेतातील गोठ्यातील गायीवर हल्ला करून तिचा फडशा पाडला. रविवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. वीज पुरवठा रविवारी दिवसा व रात्री बंद ठेवला जातो. त्यामुळे शेतकरी रात्री शेतात थांबत नाहीत. उमेश दहिते यांच्या शेतात दूध धुवून आनंदा दहिते हे घरी गोंधळ असल्याने घरी निघून गेले. आजूबाजूचे शेतकरीही वीज नसल्याने शेतात नव्हते. ही संधी साधून बिबट्याने रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गायींच्या गोठ्यावर हल्ला चढविला. या गोठ्यात अनेक गायी, बैल व घोडा होता. काही गायी, बैलांना बिबट्याने आपल्या पंजाच्या सहाय्याने बोचकून जखमी केले आहे. घोडा लांब बांधला होता. घोड्याने बिबट्यास खूप पळवले. पण घोडा सापडत नाही म्हणून बिबट्याने त्या जनावरांमधील एका गाईवर हल्ला केला. तिने जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु बांधलेला दोरच न तुटल्याने बिबट्याच्या हल्ल्यात त्या गाईचा फडशा पडला. बिबट्या तेथे आल्याच्या व नंतर दुसºया शेताकडे गेल्याच्या पाऊलखुणा परिसरात जागोजागी उमटल्या आहेत. आनंदा दहिते यांनी सांगितले की बिबट्या अनेक दिवसांपासून आजूबाजूस दुरून डरकाळ्या फोडायचा. पण शेतात शेतकरी व मजुरांचा वावर तसेच दिवे सुरू राहत असल्याने त्यास हल्ला करणे जमत नव्हते. मात्र रविवारी वीज नसल्याचा फायदा त्याने उचलला.दहिते यांनी कोंडाईबारी वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधला असून मृत गायीचा पंचनामा करण्यात यावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.