कोरोना महामारीत सर्वत्र हाहाकार उडत असताना काहीजण मदतीसाठी सर्वस्व अर्पण करत आहेत तर काही संधीचे सोने म्हणून मिळेल ते घेण्यासाठी माणुसकीची लक्तरे वेशीवर टांगत आहेत. असाच प्रकार शहरातील वाडीभोकर रोडवरील श्री गणेशा रुग्णालयात घडला़ शुक्रवारी रुग्णालयात दाखल शिरपूर येथील शिक्षक धनराज माळी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला़ मृतदेह ताब्यात घेत असताना नातेवाईकांनी मयताचे खिसे तपासले असता त्यात त्यांनी सोबत आणलेले पैसे आढळून आले नाही़ तेव्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता़ तेव्हा नातेवाईकांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली़ त्यात रुग्णालयात कार्यरत कर्मचारी मयताच्या खिशातील रोकड व आभूषणे काढत असल्याचे दिसून आले़ ही महिती नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला दिली असता त्यांनी घडलेला प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. त्यानंतर नातेवाईक मयताचा मृतदेह घेऊन शिरपूरला रवाना झाले़ शनिवारी यासंदर्भात रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले़ सायंकाळी मयत धनराज माळी यांचे मित्र दीपक रमेश पाटील यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार पाच वॉर्डबॉय विरोधात भादंवि कलम ४०४, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ तपास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील घटनेचा तपास करीत आहेत़
देवपुरातील श्री गणेशा रुग्णालयात हा प्रकार घडला आहे़ दाखल तक्रारीनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येईल़ त्यानुसार, त्यात दिसणारे पाच वॉर्डबॉय यांना चौकशीसाठी बोलाविण्यात येईल़ सध्या कोरोना काळ सुरू असल्यामुळे त्यांना तूर्त बोलाविण्यात येणार नाही़
- चंद्रकांत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, देवपूर पोलीस स्टेशन