शिरपूर : तालुक्यात गेल्या आठवडय़ात झालेल्या वादळी पावसाने उभ्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा प्रत्यय या नुकसानीच्या पंचनाम्यातून आला आहे. तालुक्यातील 31 गावांमधील 865 हेक्टर क्षेत्रात पंचनामे पूर्ण करण्यात आले. त्यात बाजरी, ज्वारी या तृणधान्यासह कापूस, फळपिके व भाजीपाला यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिरपूर व शिंदखेडा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने तेथे स्वाभाविक जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनाम्याच्या कामांना गती दिली आहे. तलाठी व कृषी सहायक पाऊस उघडताच शनिवारी दुपारी शेतांवर पोहचले. शिरपूर तालुक्यात शिरपूरसह थाळनेर, होळनांथे, अर्थे, जवखेडा, बोराडी व सांगवी या मंडळांमध्ये पावसाने थैमान माजविले होते. शिरपूर तालुक्यात 31 गाव शिवारांमध्ये जाऊन पंचनामे करण्यात आले. त्यात 201 हेक्टरवरील बाजरी, 186 हेक्टर क्षेत्रातील ज्वारी, 98 हेक्टर क्षेत्रात फळपिके व 11 हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. तर सर्वाधिक फटका कापूस पिकाला बसला असून सुमारे 360 हेक्टर क्षेत्रात या पिकांचे अतोनात नुकसान झाले. सलग तीन दिवस पाऊस बरसल्याने सर्वत्र पाणीचपाणी झाले. त्यामुळे दोन दिवस कर्मचा:यांना पंचनाम्याची कार्यवाही करता आली नाही. मात्र शनिवारी पावसाने उघडीप देताच महसूल विभागाचे सर्कल, तलाठी तसेच कृषी विभागाचे कृषी सहायक पंचनाम्यासाठी पोहचले. अद्याप काही शेतांमध्ये पाणी साचले असून काही शेतांमध्ये पाणी जमिनीत मुरले, मात्र सर्वत्र चिखल आहे. त्यामुळे तेथे पंचनामे करता येत नसल्याचे कर्मचा:यांकडून सांगण्यात आले. परंतु येत्या दोन-तीन दिवसात तेथील नुकसानीचेही पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत. स्वत: तहसीलदार नितीन पाटील कर्मचा:यांना या संदर्भात मार्गदर्शन करीत आहेत.