ऑनलाईन लोकमत
कापडणे,दि.27 - धुळे तालुक्यातील कापडणेसह परिसरात रब्बी हंगामातील उन्हाळी भूईमूग पिकाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. परंतु, उन्हामुळे येथील परिसरातील विहिरी व कूपनलिका आटल्याने निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा भूईमूग पिकाला फटका बसला आहे. काही ठिकाणी या पिकांची वाढ देखील खुंटल्याचे चित्र दिसत असून त्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाला आहे.
खर्च जास्त; उत्पादन कमी
रब्बी हंगामात भूईमूगाच्या पिकांचा पेरा येथील ब:याच शेतक:यांनी केला होता. परंतु, बहुतांश शेतक:यांना या पिकातून मोठा तोटा सहन करावा लागत आहे. भूईमूग पिकाची पेरणी करण्यापूर्वी शेतक:यांना शेती मशागत करून घेतली. त्यानंतर तीन हजार रुपयांच्या रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या, 3500 रुपयांची भूईमूग शेंगा बियाणे, तीन हजार रुपये दोन वेळेच्या निंदणीची मजुरी, तसेच कोळपणी, खूरपणी, भूईमूग शेंगा काढणी यासाठी सुमारे एका शेतक:याला 17 ते 18 हजार रुपये खर्च आला. परंतु, त्या तुलनेत उत्पादन अगदी कमी निघाल्याने हे पीक लागवड करण्यासाठी आलेला खर्चही निघत नसल्यामुळे येथील शेतकरी कमालिचा अडचणीत सापडला आहे.
काही भागात शेंगाच लागल्या नाहीत
कापडणे परिसरातील शेतकरी जिजाबराव नारायण पाटील या शेतक:याने त्याच्या शेतात सव्वा एकर जमिनीत 40 किलो बियाणे टाकले होते. चार महिने त्यांनी वेळेवर पिकाला पाणी दिले. त्यासाठी हजारो रुपये खर्च केला. परंतु, ऐन भूईमूग काढणीच्या वेळी पाणी टंचाई व वाढत्या तापमानामुळे त्यांच्या शेतातील भूईमूगाला शेंगा लागलेल्या नाहीत.
काही झाडांना शेंगा लागल्या परंतु, त्यांची संख्या दोन ते तीनच असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच भूईमूगाच्या पाल्याचीही वाढ खुंटल्यामुळे मोठा तोटा त्यांना सहन करावा लागत आहे.