महापालिकेच्या सभागृहात स्थायी समिती सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. उपायुक्त शिल्पा नाईक, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य शीतल नवले, अमोल मासुळे, नागसेन बोरसे, अमिन पटेल, कमलेश देवरे, नगरसेविका किरण कुलेवार, भारती माळी, हिना पठाण आदींची उपस्थिती होती.
इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये
नगरसेवक सुनील बैसाणे यांनी महापालिकेतून फाइली, नस्ती, गहाळ व चोरी होत असल्याचा आरोप केला. मी स्थायी सभापती असताना एक फाइल गहाळ झाल्याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे. एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही अज्ञात व्यक्ती कोण आणि चोरी होत असेल तर अधिकारी व कर्मचारी करतात काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भ्रष्टाचार लपविण्यासाठी महापालिकेत जळीतकांड झाले होते. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत १६ लाख रुपयांचा कामांचा प्रस्ताव असून, ठेकेदाराला कार्यादेश देखील देण्यात आले. कामांच्या नस्तींबाबत चौकशी केली असता ती चोरीस गेल्याचे समोर आले. गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
खाली बसण्याचा इशारा
प्रभागातील पाणीप्रश्न अद्याप सुटलेला नाही. हेतुपुरस्कार असे होत असेल तर ही बाब योग्य नाही. पुढील बैठकीपर्यंत पाणीप्रश्न सुटला नाही तर पुढच्या बैठकीत आपण चटई टाकून खाली बसून निषेध नोंदवू, असा इशारा सुनील बैसाणे, नगरसेविका किरण कुलेवार यांनी दिला. त्यासंदर्भात त्यांनी सभापती जाधव यांना निवेदनदेखील सादर केले.
डायरियाचा उद्रेक
अल्पसंख्याक भागात दूषित पाण्यामुळे डायरियाचा उद्रेक होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच पाच ते सहा जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. गेल्या दोन बैठकांपासून हा मुद्दा आपण मांडत आहोत. त्यानंतर प्रभागात सर्वेक्षणदेखील झाले. मात्र डायरियाचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. लवकरात लवकर याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी अमिन पटेल यांनी केली.
रुग्णचालकाकडून लूट
कोरोनाबाधित रुग्णांसह नातेवाइकाकडून रुग्णवाहिका चालक व मालकाकडून अक्षरश: लूट सुरू झाली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. महापालिकेच्या दोन रुग्णवाहिका असून, त्या उपलब्ध करून द्यायला हव्यात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने रुग्णवाहिकेला व्हेंटिलेटरची सुविधा करावी, अशी मागणी अमिन पटेल, अमोल मासुळे यांनी केली.
लसीकरणासाठी नोंद गरजेची
डॉ. महेश मोरे म्हणाले, शहरात २३ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. शासन निर्देशानुसार एका केंद्रावर १०० लसींचा पुरवठा केला जात आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र तसे हाेत नसल्याने गर्दी व गोंधळ उडतो आहे. यापुढे केंद्रावर सर्वांत अगोदर येणाऱ्या शंभर जणांनाच टोकण देऊन लस दिली जाईल, असे नियोजन केले आहे.