आॅनलाइन लोकमतधुळे : शहरातील जिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये सीटी स्कॅन, एमआरआयची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध केला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित अटल महाआरोग्य शिबिरप्रसंगी केली. धुळे आतापर्यंत मागे राहिले, परंतु आता यापुढे तसे होणार नाही, असे सूतोवाचही त्यांनी केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ आयोजित या महाआरोग्य शिबिरास सकाळपासूनच प्रारंभ झाला होता. मुख्यमंत्र्यांचे शिबिरस्थळी ११.१५ वाजता आगमन झाले. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री व या शिबिराचे आयोजक गिरीष महाजन, रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार अनिल गोटे, आमदार स्मिता वाघ, जळगावचे आमदार राजू भोळे, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल आदी उपस्थित होते.धुळ्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी काही संकल्पनांवर काम केले जाणार आहे. त्या अंतर्गत सुलवाडे-जामफळ योजनेसाठी हजारो कोटीच्या निधीस मान्यता दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.दुष्काळासह विविध प्रश्नांचा उहापोह करणाºया जयकुमार रावल यांच्या भाषणाचा धागा पकडून त्यांनी धुळ्याचे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. आरोग्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आयुष्मान भारत ही आरोग्य योजना आणत असून त्यानुसार ५० कोटी लोकांना प्रत्येकी ५ लाखापर्यंत वैद्यकीय विमा काढण्यात येणार आहे. त्यात समाविष्ट आजारांचा समावेश राज्याच्या म.फुले आरोग्य जीवनदायी योजनेत केला जाईल, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नसून अद्याप पाऊस बाकी आहे. मात्र दुष्काळ राहिल्यास शासनाची मदतीची भूमिका राहील, असेही ते म्हणाले.या प्रसंगी मंत्रीद्वय जयकुमार रावल व गिरीष महाजन यांनीही भाषणे केली. रावल यांनी शहर व जिल्ह्याचे प्रश्न मांडले. तर महाजन यांनी वैद्यकीय उपचारांसाठी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांनी हा कार्यक्रम पक्षीय नव्हे तर सर्वपक्षीय असल्याचे नमूद करून सर्वांसाठी खुला असल्याचे सांगितले.प्रास्ताविक डॉ.तात्या लहाने यांनी केले. शिबिरस्थळी रूग्णांच्या रांगा दरम्यान सकाळपासून येथील आरोग्य शिबिरात जिल्हा तसेच अन्य जिल्ह्यातूनही रूग्ण व त्यांचे नातेवाईक दाखल झाले होते. विविध आजारांवरील तपासणी कक्षाबाहेर त्यांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या पहावयास मिळाल्या. तपासणी करून ज्या रूग्णांवर शस्त्रक्रिया गरजेची असेल त्यांना स्टीकर (लोेगो) देण्यात येत आहेत. पुढील चार महिन्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले.