धुळे - मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर तब्बल ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार केला. त्यानंतर काही दिवसांनी खातेवाटप जाहीर झाले. शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपात अनेक धक्कादायक बदल दिसल्याचे बोलले जात आहे. खातेवाटपानंतर शिंदे गटातील नाराजी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या अनपेक्षित बदलामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि मंत्री दादा भुसे नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, आता स्वत: दादा भुसेंनी नाराजीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
बंदरे व खनिजकर्म मंत्री दादा भुसे आज धुळे दौऱ्यावर ध्वजारोहण समारंभासाठी आले असता त्यांना या मंत्रिमंडळामध्ये हलके मंत्रीपद मिळाल्याबाबत विचारणा करण्यात आली. ते नाराज असल्या संदर्भात विचारले असता, मंत्रीपदावर आपण नाराज नसल्याचे सांगत आपल्या मागणीनुसारच हे मंत्री पद मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी मिळालेल्या कृषी विभागात काम करत असताना वारंवार होणारा प्रवास, वारंवार अवकाळी पावसामुळे प्रत्येक ठिकाणी नुकसानी संदर्भात पोहोचताना होणारा त्रास लक्षात घेता, आपणच हे खातं नको, असे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांना देखील सांगितले. मिळालेल्या मंत्रीपदावर आणि खातेवाटपावर आपण समाधानी असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, दादा भुसेंच्या नॉट रिचेबलवरुनच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
वाहतुकीचे नियम पाळावे
आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनामुळे रस्त्यांच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा पुन्हा ऐरणीवर आल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले. शासनातर्फे नियम बनवले जातातच परंतु, त्या नियमांचे आपण पालन किती करतो याचे आत्मचिंतन करण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे. वाहतुकीचे नियम पाळणे देखील अपघात टाळण्यासाठी तितकेच आवश्यक असल्याचे भुसे यांनी यावेळी म्हटले.
एकनाथ शिंदेंची कसरत
शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे गटात गेलेल्या काही मंत्र्यांची मात्र निराशा झाल्याचे खातेवाटपानंतर दिसून येत आहे. दादा भुसे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषीमंत्री होते. मात्र, शिंदे सरकारमध्ये भुसे यांच्यावर बंदरे व खनिकर्म खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भुसे यांच्याकडे आधीच्या तुलनेत दुय्यम खाते दिल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात नाराज आमदार आणि मंत्र्यांची समजूत काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.