मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पातून डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदर कालव्याची दुरुस्ती केली असती तर शेतकºयांचे नुकसान टळले असते. आता झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल शेतकºयांनी केला आहे.१४ वर्षाच्या प्रदिर्घ काळानंतर येथील अमरावती मध्यम प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी साठा झाला. मात्र, १० सप्टेंबरपर्यंत पाण्याची पातळी २२४.४५ मीटर एवढी ठेवावी लागत असल्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केले. यासाठी डाव्या व उजव्या कालव्यातून सध्या पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, पाणी शेतात झिरपल्याने मालपूर, सुराय, मांडळ, खर्दे येथील शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास यामुळे हिरावला जाण्याची भिती निर्माण झाली आहे. या प्रकल्पाला सुमारे ७ कि.मी. डावा व १४.२० कि.मी. उजवा कालवा असून याद्वारे मेथी, विखरण आणि कामपूर येथील पाझर तलाव भरण्याची तरतूद आहे. मालपूर ग्रामस्थांनी विखरण पाझर तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्यास तीव्र विरोध केला होता. यासाठी ठिय्या आंदोलनही केले होते. मात्र, २७ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे व विखरणचे सरपंच महेंद्र पवार यांनी कालव्याच्या गेटचे पूजन करुन पाणी सोडले.डाव्या व उजव्या कालव्यात प्रचंड काटेरी वृक्ष वाढले असून हेडरेग्युलेटरची दुरवस्था झालेली आहे. काही ठिकाणी मातीचा बांध फुटलेला आहे. तसेच कालव्यात प्रचंड मातीचे ढिग आहेत. यामुळे कालव्याची दुरुस्ती होणे गरजेचे होते. मात्र, पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष करुन घाईगडबडीने हे पाणी सोडल्यामुळे शेतकºयांच्या कंबरेएवढ्या कापूस पिकात पाणी साचू लागल्यामुळे सर्व पिकच वाया जाणार आहे. काही ठिकाणी कापूस आपोआप पाण्यामुळे मुळासकट उखडून निघाले आहे. काही ठिकाणी भुईमूग, मूग आदी शेतात सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे.विखरण पाझर तलाव भरण्यासाठी सोडण्यात आलेले हे पाणी अद्याप तिथे पोहोचलेले नाही. खर्दे, मांडळ येथील लेंढुर नाल्यामध्ये गळती लागल्यामुळे या नाल्याने नदीचे नदीचे स्वरुप धारण केले आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. फरशीवरुन पाणी वाहत असल्यामुळे खर्दे, मेथी, वरझडीकडे जाणारा रस्ता बंद झाला असून यामुळे रस्त्याची देखील दुरवस्था होणार आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत करत आहे. विखरण तलावातही पाणी पोहचत नाही व खर्दे ते मालपूर दरम्यान प्रचंड शेती पिकांचे नुकसान होत आहे. तरी पाणी सोडण्याचा एवढा हट्टाहास का, असा सवाल येथील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अगोदर कालव्याची दुरुस्ती करावी व नंतर पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.या सोडलेल्या पाण्यामुळे शेती पिकांचे नुकसान होत असून पाण्याची पातळी समान ठेवण्यासाठी हे पाणी अमरावती नदीत सोडावे व शेतकºयांचे पिक वाचवावे, अशी मागणी मालपूरसह परिसरातील शेतकºयांनी केली आहे.अमरावती प्रकल्पाच्या नादुरुस्त उजव्या कालव्यामुळे माझ्या शेतात पाणी पाझरुन दोन एकराच्या वर कापूस पिक वाया गेले आहे. याला जबाबदार कोण, भरपाई कोण देणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अगोदर पाट दुरुस्ती करण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, आमचे ऐकून घेतले नाही, घाईगडबडीत पाणी सोडण्यात आले. हे पाणी त्वरित बंद करण्यात यावे व प्रथम पाटचारी दुरुस्त करावी आणि मगच पाणी सोडावे.झालेल्या नुकसानीची जबाबदारी स्विकारुन पाटबंधारे विभागान भरपाई द्यावी-बापू रामचंद्र पाटील, शेतकरी मालपूरशेती पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे पाणी कमी केले आहे. मांडळजवळ नाल्यावर गळती लागली आहे. यामुळे मेथी, खर्दे, वरझडी रस्ता काल बंद होता. प्रकल्पात पातळी वाढल्यास अमरावती नदीत पाणी सोडण्यात येईल. -प्रशांत खैरनार, अभियंता पाटबंधारे विभाग अमरावती प्रकल्प, मालपूर
शेतात पाणी शिरुन पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 10:22 PM