धमाणे : धुळे तालुका व परिसरामध्ये शुक्रवारी व आज दुपारी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील मका, ज्वारी, बाजरी, कापूस, पपई आदी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे धुळे तालुक्यातील देऊर व परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी दुपारी मोठ्या प्रमाणात जोरदार वादळी वाºयासह पाऊस झाल्याने देऊर परिसरातील १५२ हेक्टर मका, १३५ हेक्टरवरील बाजरी पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पपईची झाडे अनेक ठिकाणी उन्मळून पडली आहे. कापसाचेही मोठे नुकसान झाले आहे. पोल्ट्री फार्मवरील पत्रा उडून गेला आहे. पावसामुळे सुमारे ४०० पेक्षा अधिक शेतकºयांना फटका बसला आहे. नुकसानीची प्राथमिक पाहणी देऊर परिसरातील कृषी सहाय्यक किरण देवरे व तलाठी प्रतिनिधी म्हणून कोतवाल हजर होते. याबाबत सर्व अहवाल महसूल प्रशासनाला देण्यात येणार असून त्यानंतर पंचनामा प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान ज्या शेतकºयांनी पीक विमा काढला आहे. त्यांनी शेतात झालेल्या नुकसानीची आॅनलाइन तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.
देऊर परिसरात मका, बाजरी पिकासह पपईचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 1:39 PM