लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करावी, प्रतिवर्षी कलावंतांचे तीनशे प्रस्ताव मंजूर करावे, यासह विविध मागण्यांसाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे मंगळवारी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी शिवदे यांना खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलनात शाहिरांनी आपली शाहिरी कला दाखवत अनोखे आंदोलन केले. यात महिला शाहीर कलावंतांचा देखील सहभाग होता. राज्य शासनातर्फे वृद्ध कलावंतांना मानधन दिले जाते. मात्र हे मानधनही वेळेत मिळत नाही. कलावंतांच्या बँक खात्यावर आॅनलाइन मानधन जमा होईल, असे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही होताना दिसत नाही. शासन प्रतिवर्षी केवळ ६० कलावंतांची मानधनासाठी निवड करते ती मर्यादा ३०० पर्यंत करावी, अशा मागण्यात करण्यात आल्या. तालुक्यात शाहीरी कलावंत आहेत. मात्र या कलावंतांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता पं.स. कार्यालयासमोर जवळपास तीन तास धरणे आंदोलन केले. यावेळी गटविकास अधिकारी शिवदे यांना वारकरी मंडळातर्फे मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनात प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप, प्रदेश महासचिव नानाभाऊ वाघ, जिल्हाध्यक्ष पांडुरंग माळी, जिल्हा उपाध्यक्ष नागराज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष जयसिंग गिरासे, जिल्हा संघटक शिवदास माळी, तालुकाध्यक्ष पांडुरंग माळी, शाहीर व भजनी मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
शिंदखेड्यात वृद्ध कलावंतांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:19 PM