धुळे : सुरत-नागपूर महामार्ग चाैपदरीकरण कामाच्या अंतर्गत चितोड गावाजवळ भुयारी रस्ता व पुलाचे बांधकाम चुकीच्या जागेवर झाल्याने पावसाळ्यात गावाला पुराचा धोका असून योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच या कामामुळे महेश्वरनगरजवळ नाल्याची रुंदी कमी झाल्याने घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शहरापासून जवळच असलेल्या चितोड गावाजवळ मोतीनाल्यावर भुयारी मार्ग आणि पुलाचे बांधकाम केल्याने पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरते. गेल्या वर्षी शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थ विस्थापित झाले होते. संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळीदेखील सामाजिक कार्यकर्ते गाैतम पगारे यांच्यासह गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आली होती. यावर्षी देखील पुराचे पाणी गावात शिरू नये यासाठी योग्य वेळी दखल घेण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या नाल्यावरील रस्त्यावर पुन्हा खोदकाम करून पाईप टाकण्यात येत आहेत. या कामामुळे तसेच सर्व्हिस रोडमुळे महेश्वरनगर लगत नाल्याची रुंदी कमी झाली असून पावसाच्या पाण्याचा निचरा होणार नाही. रहिवाशांच्या घरात पाणी शिरून नुकसान होईल.
चितोड गावात तसेच महेश्वरनगर वस्तीमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने मालमत्तेचे नुकसान झाले किंवा जीवित हानी झाली तर त्याला प्रशासन जबाबदार असेल. त्वरित उपाययोजना केल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा गाैतम पगार, शशिकांत सरदार, मनोहर वाघ, सरुबाई येरगे, ईश्वर साळवे, शीतल सुतार, जमदाळे, सुभाष कर्ने, दिलीप लगड, महेंद्र राजपूत, गवळी, मलाराम चव्हाण, बडगुजर सर्व रा. महेश्वरनगर आणि भटू गवळी, योगेश वाणी, माळी, महादू गवळी, प्रशांत गवळी, सचिन गवळी, दादा गवळी सर्व रा. चितोड यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
नाल्यामध्ये बेकायदेशीर खोदकाम
महेश्वनगरजवळ मोतीनाल्यामध्ये बेकायदेशीर खोदकाम करण्यात येत आहे. यामुळे नाला बंद झाला तर घरांमध्ये पाणी शिरेल म्हणून येथील रहिवाशांनी खोदकामाला विरोध केला. त्यामुळे रवींद्र उत्तमराव वाघ, नीलेश काबरा यांच्यासह गुंडांकडून येथील नागरिकांना धमकावले जात आहे. पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी केल्या जात आहेत. पोलिसांनी रहिवाशांना नोटीस बजावली आहे. धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी नाल्याची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला. परंतु धुळे तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी या बेकायदेशीर खोदकामाला संरक्षण देत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.