लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : केंद्रीय समितीच्या पाहणीनंतर दोंडाईचा शहराला हगणदरीमुक्त घोषित करण्यात आले असून, शहर हगणदरीमुक्त घोषित झाल्यामुळे शासनाने दोंडाईचा-वरवाडे नगरपालिकेला तब्बल दीड कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे.नगराध्यक्षा नयनकुंवर रावल यांनी दोंडाईचा शहर हगणदरीमुक्त करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार २० मार्च रोजी जिल्हास्तरीय समितीचे सदस्य शिरपूरचे प्रांताधिकारी नितीन गावंडे, शिरपूर तहसीलदार महेश शेलार यांनी शहरातील नदीपात्रे व सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली होती. तसा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. त्याच आनुषंगाने शासनाच्या एका समितीने १ जुलैला दोंडाईचा शहरात पाहणी दौरा केला होता. तेव्हा या समितीने शहरातील अमरावती नदी, शहादा रोड, लेंढुर नाला व इतर परिसरात पाहणी केली. तेथील नागरिकांशीही चर्चा केली. तसेच व्यक्तिगत लाभार्थींची भेट घेऊन सखोल माहिती घेतली होती. त्यानंतर तसा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यानंतर केंद्रीय पथकातील केंद्रीय गुणवत्ता तपासणी विभागाचे निरीक्षक मयूर उदारे यांनीही शहरातील विविध ठिकाणी पाहणी केली होती. या वेळी त्यांच्यासोबत मुख्याधिकारी अजित निकत, माजी विरोधी पक्षनेते प्रवीण महाजन व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दोंडाईचा शहरात आतापर्यंत १२५९ कुटुंबाना व्यक्तिगत शौचालये मंजूर करून त्यांना अनुदानही उपलब्ध करून देण्यात आले आहे. दोंडाईचा शहर हे हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित झाल्यानंतर शासनाने दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेच्या कामाचा गौरव करून प्रथमच दीड कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, आरोग्य सभापती वैशाली महाजन यांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख बक्षीस देऊन मुंबई येथे सन्मान करण्यात येणार आहे.