सोनगीर : धुळे तालुक्यातील दापुरा येथील जेसीबी यंत्राचे काम करीत असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोहिदास प्रताप पाटील (२८) असे त्याचे नाव असून तो भारतीय सेना दलात नाईक पदावर ईएमई विभागात पुणे येथील बॉम्बे इंजिनिअरिंग वर्क्स येथे कार्यरत होता. बुधवार ४ रोजी सकाळी दहाला ही घटना घडली. दुपारी बाराला दापुरा येथे मोबाइलद्वारे आईवडिलांना माहिती देण्यात आली. त्याच्या निधनाने अवघे गाव हळहळले. गुरुवार ५ रोजी सकाळी नऊला त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दापुरा (ता. धुळे) येथील प्रताप भाईदास पाटील व प्रमिला पाटील यांचे रोहिदास हा लहान पुत्र आहे. तर सर्वात मोठा रत्नाकर हा शेती व्यवसाय करतो. मधला विनोद हादेखील सैन्य दलात कार्यरत आहे. रोहिदास आज सकाळी जेसीबीच्या टोकावरील पारड्यात उभा राहून तो दुरुस्ती करीत असताना पारड्यातून खाली पडून तो जमिनीवर आदळला. त्याला सैनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या जवळच्या नातलगांनी दिली. त्याचा सैन्यदलातील भाऊ विनोद पुण्यातच असल्याने त्याला भावाच्या मृत्यूची घटना कळविण्यात आली. विनोदनेच दापुराला घटनेची माहिती दिली. लहान गाव असल्याने लगेचच गावात घटना माहिती झाली. शेतीचे व अन्य व्यवहार ठप्प झाले. संपूर्ण गाव एकच भाऊबंदकीचे व एकाच कुळाचे असल्याने सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रोहिदासचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्याला तीन महिन्यांची मुलगी आहे.
दापुरा येथील जवानाचा अपघातात मृत्यू
By admin | Published: January 04, 2017 11:59 PM