सुनील साळुंखे
शिरपूर : तालुक्यातील सावळदे गावाजवळील तापी नदी पात्रात सोमवारी एकाच दिवशी दोन मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, तापी नदी पुलावर जाळी बसविण्याची जोरदार मागणी तालुकावासीयांकडून करण्यात येत आहे. राज प्रेमसिंग राजपूत (२४, रा.अहिल्यापुर) व अशोक नामदेव मराठे (४७, रा.जनता नगर,शिरपूर) असे दोन्ही मृतदेह आढळून आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी उपजिल्हा रूग्णालयातील वॉर्डबॉयने खबर दिल्याने थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील जनता नगरमधील अशोक मराठे यांची शनिवारी सावळदे येथील तापी नदी पुलावर दुचाकी संशयास्पद आढळून आली. शनिवार व रविवारी या दोन्ही दिवशी नदी पात्रात त्याचा शोध घेण्यात आला. रविवारी त्याचा नदी पात्रात पुलावरून शोध घेतला जात असतांना त्याचदरम्यान अहिल्यापुर येथील २४ वर्षीय राज प्रेमसिंग राजपूत याने पुलावरून उडी घेतली होती. तेव्हापासून दोघांचा नदी पात्रात शोध घेतला जात होता.
सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास राज रजपूत याचा तर अशोक मराठे याचा अकरा वाजेच्या सुमारास मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. दोन्ही मृतदेह बाहेर काढून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रसंगी दोन्ही मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी थाळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीआहे.