ऑनलाईन लोकमतपिंपळनेर, धुळे, दि. 31 - सेट्रिंग काम करत असताना अचानक शेजारील घराची मातीची भिंत अंगावर पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळनेर शहरातील न्हावी हुडा परिसरात बुधवारी दुपारी घडली आहे. मयत मजुराचे नाव नूरखान लालखॉ पठाण (50, रा. नंदुरबार, ह. मु. पिंपळनेर) असे आहे. शहरातील न्हावी हुडा येथे एका घराचे नव्याने बांधकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी चार मजूर तेथे काम करीत होते. त्याचवेळी अचानक मातीची भिंत कोसळली. मातीची भिंत कोसळत असल्याचे पाहून तीन मजुरांनी तेथून पळ काढला तर नूरखान लालखॉ पठाण हे मातीच्या ढिगा:याखाली दाबले गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मातीची भिंत पडल्याने परिसरात मोठा आवाज झाला. तो ऐकून घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांना दूरध्वनीवरून घटनेसंदर्भात माहिती देण्यात आली. तेदेखील घटनास्थळी आले. यावेळी तहसीलदार वाय. सी. सूर्यवंशी उपस्थित होते. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. मातीच्या ढिगा:याखाली दाबल्या गेलेल्या नूरखान यांना तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तोर्पयत त्यांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात पिंपळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पिंपळनेर येथे मातीची भिंत पडून मजुराचा मृत्यू
By admin | Published: May 31, 2017 5:58 PM