देवेंद्र पाठक, धुळे: शेती काम करत असताना अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्ध शेतकऱ्याचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना धुळे तालुक्यातील आर्णी शिवारात सोमवारी घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. पिरन राजधर पाटील (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
धुळे तालुक्यातील बाळापूर शिवारात पिरन पाटील हे वृद्ध शेतकरी नेहमीप्रमाणे भाऊ, मुलासह शेतात काम करत होते. सोमवारी सकाळी मधमाश्यांनी पिरन पाटील यांच्यावर हल्ला चढविला. मधमाश्यांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी शेतातील काम सोडून जवळच असलेल्या नाल्याच्या पाण्यात त्यांनी उडी घेतली. त्यांना मधमाश्यांनी मोठ्या प्रमाणावर चावा घेतल्याने शेताच्या नाल्यात बेशुद्ध अवस्थेत पडून होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने खासगी वाहनाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉ. रिना शाहू यांनी तपासून दुपारी सव्वा दोन वाजता मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस नाईक पाटील घटनेचा तपास करीत आहेत.