दोंडाईचा (जि.धुळे): विषारी जातीच्या सर्पाने दंश केल्याने दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे दोंडाईचापासून जवळच असलेल्या वणी गावात घडली. निकिता गणेश ठाकरे (वय ११) व सविता गणेश ठाकरे (वय १०) अशी मयत बहिणीची नावे आहेत.वणी (ता.शिंदखेडा) येथील गणेश दीपचंद ठाकरे ( भील) हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गावाबाहेरच त्यांचे घर आहे.
कुटुंबीयांसमवेत झोपले असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास मण्यार जातीच्या सर्पाने दंश केला म्हणून लहान मुलगी सविता उठली. थोड्यावेळाने तिचे अंगही लाल झाले. निकितालाही सर्पाने दंश केला. दोघींना त्रास होऊ लागल्याने, पालकांनी पहिले निकिताला व नंतर सविताला दोंडाईचा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॅा. ललितकुमार चंद्रे यांनी दोघींना सर्पदंशाचे इंजेक्शन देऊन तसेच उपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ नंदुरबार येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविले.
उपचार सुरू असताना पहिले सविताचा मृत्यू झाला, त्यानंतर चार तासाने निकिताचा मृत्यू झाला. काही तासातच दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोघी बहिणी दोंडाईचा येथील आरडीएमपी हायस्कूलमध्ये शिकत होत्या. निकिता सातवीत तर सविता पाचवीच्या इयत्तेत होती. दोघींवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.