धुळे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया मंगळवारी किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली़ दिवसभरात सरासरी ६५ टक्के मतदान झाले आहे़ मतमोजणी प्रक्रिया बुधवारी सकाळी १० वाजेपासून चारही तालुक्यातील नियोजित ठिकाणी सुरु होणार आहे. निवडणुकीत आजी - माजी आमदारांचे राजकीय प्रतिष्ठापणाला लागली असल्याने निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.जि.प. व पं.स. निवडणूकीसाठी मतदानाला सकाळी ७़३० वाजता सुरूवात झाली़ परंतु थंडीमुळे सकाळी मतदान केंद्रावर बहूतांश मतदान केंद्रावर तुरळक उपस्थिती होती़ मात्र सकाळी ११ वाजेनंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. उमेदवारांकडून मतदानास जाणाऱ्या मतदारांना हात जोडले जात होते, तर काही जेष्ठ नागरिकांचा नमस्कार देखील केला जात होता़ एकमेकांचे प्रतिस्पर्धी उमेदवार यावेळी एका रांगेत उभे होते़ बºयाच मतदारांनी लक्ष्मीदर्शनाची वाट पाहत मतदान केले नाही. मात्र लक्ष्मीदर्शन झाल्यानंतर अर्थात दुपारी ३ वाजेनंतर मतदान केंद्रांमध्ये मतदारांची गर्दी वाढली. सायंकाळी उशिरापर्यंत काही गटांमध्ये मतदारांच्या रांगा लागल्या होत्या़ त्यामुळे ५़३० वाजता मतदान केंद्रातील प्रवेश बंद करण्यात आल्यानंतरही केंद्रात बराच वेळ मतदान प्रक्रिया सुरू होती़ अनेक अपंग, वृध्द मतदारांनी मतदान केले़ त्यासाठी उमेदवारांकडून वाहन व्यवस्था करण्यात आली होती़ काही उमेदवारांच्या समर्थकांनी काही मतदान केंद्रांवर मतदारांसाठी चहा, नाश्त्याची सोय करण्यात आल्याचेही दिसून आले़ अपंग, अंध मतदारांनी देखील मतदानाचा हक्क बजावला़ मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी व पोलीसांसाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती़चुरस असलेल्या गटात गर्दीधुळे, साक्री, शिंदखेडा तालुक्यातील ज्या गटांमध्ये चुरस होती. त्याठिकाणी मतदानाचा टक्का वाढला आहे. याठिकाणी सकाळपासूनच दोन्ही कडील उमेदवारांच्या समर्थकांनी आपआपल्या भागातील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी धावपळ दिसून आली. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत याठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी दिसून आली.मतदान यंत्र ‘स्ट्राँगरूम’मध्येगट व गणातील निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदान केंद्रांवरील मतदान यंत्र व साहित्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी केंद्रात जमा केले़ त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतमोजणी केंद्रात गर्दी झाली होती़
उमेदवारांच्या भविष्याचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 10:45 PM