धुळे : गणेशोत्सव म्हटला म्हणजे मंडळाच्या अथवा घरगुती ठिकाणी आरास, सजावट आलीच. सजावटीसाठी बाजारपेठेत विविध प्रकाराचे साहित्य दाखल झालेले आहे. सजावटींच्या साहित्याने बाजारपेठ सजू लागली आहे. यावर्षी सजावट साहित्याच्या दरात किरोकोळ वाढ असून, मागणीही चांगली आहे. विशेष म्हणजे गणेशभक्तांनी चायना वस्तूंना फाटा देत स्वदेशी वस्तू खरेदीलाच प्राधान्य देत आहेत. गणेशोत्सव अगदी तीन दिवसांवर येऊन ठेपला असून, सर्वत्र तयारी जोरात सुरू झालेली आहे. मंडप उभारणीची कामे वेगात सुरू झालेली आहेत. कारण ही कामे झाल्याशिवाय मंडपाच्या अंतर्गत भागात सजावट करणे अशक्य असल्याने, आता पहिले काम मंडप उभारणीलाच दिले जात आहे.सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच घरगुती गणपती बसविण्यासाठीही आता प्रत्येकाकडे लगबग सुरू झालेली आहे. गणपती बसविण्याची जागेची स्वच्छता करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक असो अथवा घरगुती गणरायाच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरू झालेली आहे.गणेशोत्सव म्हटला म्हणजे आकर्षक सजावट आलीच.गणेश मूर्तीसमोर सुबक सजावट करण्यावर अनेकांचा भर असतो.इकोफ्रेंडली मखर बाजारातप्लॅस्टिकबरोबरच थर्माकोललाही बंदी आहे. त्यामुळे प्लॅस्टिक व थर्माकोलपासून बनविलेल्या मखराऐवजी इको फ्रेंडली मखर विक्रीस ठेवण्यात आलेले आहे. टिकावू व अत्यंत सुबक, रेखीव नक्षीकाम केलेले मखर, सिंहासन, मंदिरांना ग्राहकांची पसंती आहे. पुठ्ठे व कार्डशीटपासून तयार केलेले साहित्य अत्यंत वाजवी दरात मिळत आहे. या तयार केलेल्या मखरांमध्ये मोर आसन, डायमंड आसन, पिंपळ आसन, मयूर सेट, आदींचा समावेश आहे. या मखरांना ग्राहकांकडून चांगली मागणी असल्याचे विक्रेत्याने सांगितले. त्याचबरोबरच बाजारपेठेत प्लॅस्टिक हारांऐवजी कापडी हार, लेस, मण्यांच्या पडद्याचे अनेक प्रकार बाजारात विक्रीस आलेले आहे. दरात फारसा फरक पडलेला नसला तरी, यंदा विविध प्रकारचे पडदे, माळा, विक्रीसाठी बाजारपेठेत आलेल्या आहेत. धुळ्याच्या बाजारपेठेत मुंबई, अहमदाबाद, कोलकता या परिसरातून हे साहित्य मोठ्या प्रमाणात येत असते.
सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:29 PM