धुळे : अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र सादर करुन निवडून आलेल सरपंचांना आणि सदस्यांना पदावरुन त्वरीत हटवावे, अशी मागणी करीत एकलव्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळ्यात क्युमाईन क्लबजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे.याबाबत जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेवाडी आणि वरझडी ता. शिंदखेडा येथील सरपंच उषाबाई देवमन निकुंभ आणि सतिष टेकचंद कोळी, सदस्य मिना प्रभाकर कोळी हे बोगस आदीवासी असून त्यांनी अजुनही जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. तसेच नंदुरबार येथील अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र समितीने त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अपात्र ठरविले आहे. याबाबत गावातील देविदास नारायण मोरे आणि साहेबराव ढेपा भिल यांनी जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल केले आहे. बोगस आदीवासी सरपंच आणि सदस्य पदाचा दुरूपयोग करुन शासकीय निधीचा गैरउपयोग करीत आहेत. त्यांना त्वरीत अपात्र ठरविणे आवश्यक असताना राजकीय दबावापोटी प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या बोगस सदस्यांना त्वरीत पायउतार करावे. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अॅड राजेंद्र वाघ यांच्यासह पदाधिकाºयांनी दिला आहे.
बोगस आदीवासी सरपंचांना हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 10:07 PM