लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शासनाने सूचित केल्या प्रमाणे यंदाही जिल्ह्यात १ ते ३१ जुलै दरम्यान वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून यंदा वृक्ष लागवड करण्यासाठी ५ लाख ९८ हजार ६३१ रोपांची मागणी वन विभागाकडे करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे देण्यात आली आहे. दरम्यान, वृक्ष लागवड मोहीमेसंबंधी गुरूवारी, ३१ रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
वृक्ष लागवड मोहीमेंतर्गत जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींना ५ लाख ९० हजार २३१ वृक्षांची तर जिल्हा परिषद मुख्यालयाला स्वतंत्र ८ हजार ४०० वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट असे एकूण ५ लाख ९८ हजार ६३१ वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहीमेसाठी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ग्रामपंचायतस्तरावर खड्डे खोदण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींर्गत खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले असून त्याबाबत आॅनलाइन माहिती वन विभागाच्या संकेतस्थळावर भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वृक्ष लागवडीसाठी रोपे उपलब्धवृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात प्राप्त झालेले उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे वृक्ष लागवडीबाबतची मागणी वन विभागाकडे केली आहे. परंतु, जिल्ह्यासाठी प्राप्त उद्दिष्टांऐवढे रोपे शिल्लक असल्याची माहिती ग्रामपंचायत शाखेतर्फे देण्यात आली आहे. वन विभाग व सामाजिक वनीकरण या विभागांच्या सहकार्याने ही मोहीम राबविली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने रोपे ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिले जातील, असे सांगण्यात येत आहे.