धुळे : तालुक्यातील धामणगाव (वणी खुर्द) येथील शेत गटाच्या सातबारा उताऱ्यावर बँकेच्या पिक कर्जाचा बोजा चढविण्यासाठी धामणगावच्या तलाठ्याने ७०० रुपयांची लाच मागितली होती़ ही रक्कम त्याने स्विकारली नसलीतरी मागणी केल्याचे पोलिसांच्या तपासांत स्पष्ट झाल्याने तलाठीला देवपुरातील त्याच्या घराजवळून शुक्रवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले़धुळे तालुक्यातील धामणगाव येथील तक्रारदार यांच्या वडीलांचे दोन शेत गटाच्या सातबारा उतारावर बँकेचा पिक कर्जाचा बोजा चढविण्यासाठी धामणगाव (वणी खुर्द) येथील तलाठी महेंद्र वामनराव धाकड (५७) याने तक्रारदार यांच्याकडे ७०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार प्राप्त झाली होती़ अर्जाची पडताळणी २७ जुलै रोजी करण्यात आली़ त्यानुसार लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने विभागाने सापळा लावला होता़ लाच स्विकारण्यापुर्वी तक्रारदार यांचा संशय तलाठी धाकड यांना आल्याने त्यांनी लाच स्विकारली नाही़याप्रकरणाची सविस्तर चौकशी आणि पडताळणी केल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाकड यांना देवपूर येथील घराजवळून ताब्यात घेतले़ त्यांच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांना अटक करण्यात आली़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या पथकातील जयंत साळवे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, संदिप सरग, सुधीर सोनवणे, शरद काटके, प्रकाश सोनार, संदिप कदम, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली़
७०० रुपयाच्या लाचेची मागणी धामणगावच्या तलाठ्याला भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:25 PM